आबूधाबी – सलामीवीर शिखर धवनची नाबाद 69 धावांची खेळी तसेच कर्णधार श्रेयस अय्यर व अलेक्स कॅरीची उपयुक्त फलंदाजी यांच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 4 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दिल्लीने संघात दोन बदल केले. शेमरन हेटमायरच्या जागी अलेक्स कॅरीला तर ऋषभ पंतच्या जागी अजिंक्य रहाणेला संघात स्थान दिले. भरात असलेला पृथ्वी शॉ या सामन्यात अपयशी ठरला. त्याला केवळ 4 धावांवर ट्रेन्ट बोल्टने बाद केले. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत प्रथमच संघात स्थान दिलेल्या अजिंक्य रहाणेला मिळालेल्या संधीचा लाभ घेता आला नाही. त्याला 15 धावांवर कृणाल पंड्याने पायचीत केले. त्यावेळी दिल्लीची अवस्था 2 बाद 24 अशी बिकट बनली होती.
त्यानंतर मात्र, शिखर धवन व कर्णधार श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. त्यांनी आक्रमक फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. स्थिरावलेला अय्यर 33 चेंडूत 5 चौकार फटकावून 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर भरात असलेल्या मार्कस स्टोनिसने धवनला साथ दिली. मात्र, तो धावबाद होऊन परतला. दरम्यान, धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले.
अखेर पंतच्या जागी संघात स्थान मिळालेल्या अलेक्स कॅरीने धवनला साथ देत संघाला दीडशकी धावांच्या पुढे मजल मारुन दिली. धवनने नाबाद 68 धावांची खेळी करताना 52 चेंडूंचा सामना केला. त्याने 6 चौकार व 1 षटकार फटकावला. कॅरीने नाबाद 14 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पंड्याने 2 तर ट्रेन्ट बोल्टने 1 गडी बाद केला.
या सामन्यात दिल्लीने बिकट अवस्थेतून समाधानकारक धावसंख्या उभारली. स्पर्धेच्या क्रमवारीत दिल्लीची स्थिती भक्कम असून त्यांचा आतापर्यंतच्या सामन्यांतील खेळ अन्य संघांपेक्षाही जास्त सरस झाला आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी युवा खेळाडू श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व दिले असून तो देखील ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळत आहे.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 4 बाद 162 धावा. (अजिंक्य रहाणे 15, श्रेयस अय्यर 42, शिखऱ धवन नाबाद 69, अलेक्स कॅरी नाबाद 14, कृणाल पंड्या 2-26, ट्रेन्ट बोल्ट 1-36).