लॉस एंजेलिस – आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रिऍलिटी टिव्ही स्टार आणि मनोरंजन विश्वातील आघाडीची मॉडेल किम कार्दशियन हिने आर्मेनियाला 10 लाख डॉलरचे अर्थसहाय्य करण्याचे जाहीर केले आहे.
किम कार्दशियनचे दिवंगत वडील रॉबर्ट कार्दाशियन हे आर्मेनियन वंशाचे होते. हा वारसा लक्षात घेऊनच आपण हा निर्णय घेतला असल्याचे किमने शनिवारी केलेल्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘आर्मेनिया निधीसाठी जगभरातून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये मी माझाही सहभाग दिला आहे. त्याचा मला अभिमान वाटतो आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत मी आर्मेनिया आणि अर्तसाखमध्ये चर्चा करते आहे. या समस्येबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मला वाटते आहे. ही समस्या आणखी वाढू नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ असे ती म्हणाली.
या जनजागृतीच्या कामासाठीच आपण 10 लाख डॉलरची देणगी देणार आहे असे म्हणून तिने इतरांनाही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात जनजागृती करावी, सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात अथवा केवळ 1 डॉलरची देणगी द्यावी, असेही ती म्हणाली.
अझरबैजान आणि आर्मेनियात 27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत शेकडोजण ठार झाले आहेत. युद्धग्रस्त भागातील मदतकार्य करणाऱ्या संघटनांना हे अर्थसहाय्य दिले जाणार अहे. किमची बहीण कर्टनी कार्दशियन आणि ख्लोई कार्दशियन यांनीही या संघटनांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.