विश्रांतवाडी – क्रिकेट खेळताना लघवीच्या (लघुशंकेच्या) जागेवर चेंडू लागल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे चेंडू लागून मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना लोहगाव मधील जगद्गुरु स्पोर्ट्स अॅकडमीच्या मैदानावर गुरुवारी (दि.२) रात्री ९:००च्या सुमारास घडली.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंभू हा शाळेला सुट्टया असल्याने गुरुवारी (२ मे) सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. शंभू हा बॉलिंग करत होता, त्याने टाकलेला चेंडू (बॉल) फलंदाजाने (बॅटसमन) जोरात मारला. पुढून येणारा चेंडू शंभूला लघुशंकेच्या जागी लागला, तो मैदानावर कोसळला. त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला, परंतू अवघड (लघुशंकेच्या) जागी चेंडू लागल्याने त्याला वेदना सहन न झाल्याने तो पुन्हा खाली पडला.
सोबतच्या मुलांनी आरडा ओरड केल्याने जवळच्या नागरीकांनी शंभूला खासगी दवाखान्यात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित केले. मृत शंभूचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संरक्षक साधनांचा वापर महत्त्वाचा…
“पुतण्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशी घटना घडू नये यासाठी पालकांनी आपल्या मुलांना खेळायला पाठवताना योग्य काळजी घ्यावी. क्रिकेट असो अथवा इतर कोणताही मैदानी खेळ खेळताना संरक्षक साधनांचा वापर करावा. माझा पुतण्या अत्यंत धाडसी होता, नुकताच तो तालमीतही जात होता. शहरातील हुजूरपागा विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. त्याच्या जाण्याने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.” – बंडू खांदवे, शंभूचे काका