खासदार लोखंडे धर्म संकटात; प्रचारापासून अलिप्त

प्रा. डी. के. वैद्य

अकोले  – धर्म संकटात सापडलेले खासदार सदाशिव लोखंडे यांची छबी प्रचारात झळकेना, असे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे चित्र आहे. नुकतीच झालेल्या लोकसभेचा निवडणुकीचा त्याच्याशी नक्कीच संबंध आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत स्वतः युतीचे उमेदवार म्हणून खा. लोखंडे शिर्डी मतदारसंघात उभे होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी होते आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे. भाऊसाहेब कांबळे हे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार होते तर लोखंडे हे शिवसेनेकडून आपली खिंड लढवत होते.

या निवडणुकीत खासदार लोखंडे 2 लाखांहून अधिक मताधिक्‍य घेऊन व भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करून संसदेत गेले. मात्र त्या नंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये एकेकाळचे प्रतिस्पर्धी उमेदवार कांबळे हे त्यांच्याच पक्षात म्हणजे शिवसेनेत दाखल झाले. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारीही दिली.

दरम्यान खा. लोखंडे हे श्रीरामपूरसाठी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र ठाकरे यांनी उमेदवारीचे दान आमदारकीचा व कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळे यांच्या पदरात टाकले.

या परिस्थितीत प्रतिस्पर्धी एकेकाळचे उमेदवार व आपल्याच पक्षाचे उमेदवार कांबळे यांच्यासाठी प्रचार करायचा की अन्य ठिकाणी जायचे असा धर्म संकटाचा भाग त्यांच्यापुढे उभा राहिला असावा.खरे तर अकोले वगळता संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे या पाच मतदारसंघात लोखंडेंना विखेंच्या पुढाकाराने आघाडी मिळाली होती. या तालुक्‍यातही त्यांनी मतदार गाठीभेटी घेऊन, व आभार मानून ते प्रचार फेरी पूर्ण करू शकले असते. मात्र तसे घडताना दिसले नाही.

अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वैभव पिचड यांनी मताधिक्‍याच्या दृष्टीने आघाडीचे उमेदवार कांबळे यांना 33 हजार 651 मताचे मताधिक्‍य देऊन खा. लोखंडेंना बऱ्यापैकीची पिछाडी दिली. अकोले तालुक्‍यातील व मतदारसंघातील राजकीय चित्र सुद्धा बदलले आणि पिचड यांनी मनगटीचे घड्याळ सोडून आपल्या खांद्यावर भगवे उपरणे घेतले. युती धर्माचे पालन करण्याची जबाबदारी आणि राजकीय वैर संपवण्याची निश्‍चित चांगली वेळ खा. लोखंडेंना आलेली आहे. पण अकोले विधानसभा मतदार संघाकडे एक साधा फेरफटका सुद्धा त्यांनी मारला नाही.

अशाप्रकारची सल सामान्य शिवसैनिक व शिवसेनेचे मतदार यानिमित्ताने व्यक्त करीत आहेत. त्यांचा प्रचार कुठे चालला आहे? यापेक्षा ते धर्मसंकटात अधिक सापडले आहेत. अशा प्रकारची चर्चा असून खा. लोखंडे यांनी युती धर्माचे पालन करण्यासाठी व आपद्धर्म म्हणून श्रीरामपूर, नेवासे, कोपरगाव, संगमनेर, अकोले या ठिकाणी किमान गावोगावी भेटी देण्याची भावना त्यांचे समर्थक मागणी करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)