डांबर प्रकल्पाचे मालकही अडकणार! 

अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे कोट्यवधींचे नुकसान
नगर – श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख यांनी केलेल्या डांबर घोटाळ्यामुळे आता जिल्हाभरातील अनेक ठेकेदारांचे पितळ उघडे पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर डांबर प्रकल्प असलेले मालक देखील यात गुंतण्याची शक्‍यता आहे.

प्राप्ती कर व जीएसटी विभागाकडून डांबर खरेदीची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे किती डांबर प्रत्यक्षात खरेदी झाले व ते किती कामांवर वापरण्यात आले. याचा तपशील मिळाला तर डांबर प्रकल्पाचे मालक व ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांचे संगमत चव्हाट्यावर येण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या मिलीभगत असल्याशिवाय ठेकेदार एवढे धाडस करू शकत नाही. त्यामुळे अधिकारी देखील रडावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एका रस्त्याच्या कामासाठी खरेदी केलेल्या डांबराच्या चलनाची मुळ प्रत न जोडता झेरॉक्‍स जोडून अन्य कामांसाठी ते वापरल्यामुळे तब्बल 60 ते 65 लाखांचा डांबर घोटाळा श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख यांनी केल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एक ठेकेदार अशा पद्धतीने रस्त्यांची कामे करून लाखांचा डांबर घोटाळा करीत असले तर अन्य रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार काय पद्धत वापरत असली हे देखील या निमित्याने समोर आले आहे. या पद्धतीमुळेच रस्त्याच्या कामात डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरले जात असून परिणामी रस्ते तयार केल्यानंतर काही महिन्यात उखडतात.

जुनेद शेख यांनी 11 चलनापैकी 10 डांबरचे चलने सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागाच्या कामांसाठी वापरले असल्याचे आढळून आले. 10 डांबराचे चलनात एकूण परिमाण 147.86 मेट्रीक टन असून त्यापैकी 105.927 मेट्रीक टन डांबर सार्वजनिक बांधकाम संगमनेर विभागच्या रस्त्यांच्या कामांना वापरले आहे. तर त्यापैकी 41. 873 मेट्रीक टन डांबर शिल्लक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही विभागातील तब्बल 33 रस्त्यांची कामांसाठी 105.927 मेट्रीक टन डांबर वापरले असल्याचे स्पष्ट होत आहे.

चलन क्रमांक 086442 असून हे चलन जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांना जोडले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील कामे अशी गोंडेगाव उंदीरगाव खानापूर रस्ता कि.मी 0/ 800 ते 2/ 000 बी.बी.एम करपेट सिलकोट करणे ता. श्रीरामपूर., प्र.जि.मा. 84 ते मालुंजा मातापूर ते रा.मा.50 रस्ता कि.मी 4/000 ते 5/000 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. श्रीरामपूर., उंबरगाव मातापूर कारेगाव भोकर मुठेवडगाव ब्राम्हणगाव खैरीनिमगाव ते जाफ्राबाद ते प्र.जि.मा. 7 ला मिळणारा रस्ता किमी 20/000 ते 21/000 मजुबतीकरण व डांबरीकरण करणे ता. श्रीरामपूर., माळेगाव सरला ते जिल्हा हद्द रस्ता किमी 0/500 ते 3/000 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.

ता. श्रीरामपूर. ही कामे मुळ चलन न जोडता झेरॉक्‍स जोडण्यात आली आहे. तर या चलनावर सार्वजनिक बांधकाम संगमनेर विभागातील कामे करण्यात आली आहे. त्यात हरेगाव उंदीरगाव नाऊर रस्ता किमी 0/000 ते 17/000 सुधारणा करणे. ता. श्रीरामपूर. खंडाळा श्रीरामपूर नेवासा रस्ता किमी 133/500 ते 135/900 रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. श्रीरामपूर. अशा पद्धतीने तब्बल 33 रस्ते करण्यात आले आहेत.

ठेकेदार चलनाची झेरॉक्‍स जोड असतांनाही अधिकाऱ्यांकडून त्याला कोणता विरोध झाला नाही. उलट डांबराचे चलन जोडल्यानंतर तातडीने या ठेकेदाराला घरपोहोच कामांची बिल अदा केली आहे. जुनेद शेख यांच्या कामांबाबत तक्रारदार अशोक मुंडे यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी केली. त्यातून हा प्रकार उडघकीस आला.

यामुळे रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार डांबराचा वापर कशा पद्धतीने करतात. हे देखील समजले. एक ठेकेदार अशा पद्धतीने फसवणूक करून शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान करीत असेल तर अशाच पद्धतीने किती ठेकेदार शासनाला चुना लावत असतील. हे आता स्पष्ट होत आहे.

बनावट गुणनियंत्रण चाचणीचा अहवाल
तक्रारदाराकडून जुनेद शेख यांनी केलेल्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण केले होते. त्याची चौकशी झाली. तेव्हा करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामांचा गुणनियंत्रण चाचणी अहवाल बनावट असल्याचे खुद्द गुणनियंत्रण विभागाने म्हटले असून त्यानुसार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.

अर्थात कामाची गुणवत्ता तपासणी करण्याचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची असतांना ठेकेदारच आपण केलेल्या कामांची गुणवत्ता तपासतो. यातून अधिकारी व ठेकेदार यांच्यातील मिलीभगत समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.