नगर -रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने आधिक नगरकर प्रचंड हैराण आहेत. त्यात आता या मोकाट कुत्र्यांनी थेट नागरीकांच्या घरात घुसायला सुरुवात केल्याने मुख्यत्वे महिलांमध्ये या कुत्र्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.
नगर शहराच्या मध्यवर्ती भागात मोकाट कुत्र्यांची दहशत जास्त आहे. त्यासह सावेडी उपनगरातही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तथापि, त्याकडे महापालिका लक्ष देत नाही. आज सकाळी शहराची मध्यवस्ती असलेल्या खिस्तगल्लीत कारंजाजवळ एका घरात मोकाट कुत्रे घुसले. त्या संदर्भात स्थानिक ज्येष्ठ नागरीक शशिकांत चगेडे यांनी तत्काळ महापालिकेच्या मेलवर तक्रार पाठविली. मात्र, त्याकडे सायंकाळी उशिरापर्यंत कोणीच लक्ष्य दिले नाही.
अखेरीस स्थानिक तरुणांनी ते कुत्रे बाहेर काढले. तथापि, कोंडवाडा विभाग अशा कामांकडेही लक्ष्य देत नसल्याबाद्दल खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, चंगेडे यांनी स्थानिक प्रभाग अधिकारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनाही संपर्काचा प्रयत्न केला. तथापि, सर्वांचेच मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात येत होते. विशेष म्हणजे कुत्री पकडण्याचे कुठलीच यंत्रणा महापालिकेत उपलब्ध नाही. सध्या शहरातल्या अर्बन बॅंक, माणिक चौक, काटे गल्ली, पानसरे गल्ली, शहाजी रोड या भागात गेल्या आठ दिवसांपासून रात्री कुत्र्यांची टोळकी मोठमोठ्याने भुंकत व आक्रमक होत असल्याने नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.
या भागातील नगरसेवक व केअर टेकर यांना भटक्या कुत्र्यांची ही टोळकी दिसत नाहीत का? त्यांचा बंदोबत महापालिका का करत नाहीत? असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. श्वानदंशाची घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. सिव्हिल हॉस्पिटल, बंगाल चौकी रस्ता या भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रोज फिरताना दिसत आहेत त्यांच्यामुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने पावले उचलत मोकाट कुत्री व या भटक्या जनावरांचा बंदोबत करण्याची मागणी होत आहे. आता यात आयुक्तांनीच लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करत आहेत.