नगर -पावसाळा सुरू झाल्यामुळे आता शहरात साथीचे आजार वाढू शकतात. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टिने प्रत्येक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांस जबाबदारीने काम करावे लागेल. त्यात सध्या कचरा संकलनाचे काम चांगल्या पध्दतीने सुरू आहे. तथापि, अजूनही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. रस्त्यावर कचरा टाकणारे शोधून त्यांच्यावर दंडातकमक कारवाई करा, अशा सक्त सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिल्या. स्वच्छता निरिक्षकांनीच प्रभागात फिरून ही दंडात्मक कारवाई करावी, अशी ताकीद महापौर वाकळे यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक मनोज कोतकर, मनोज दुलम, सतीश शिंदे, मनोज ताठे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, प्रकल्प विभाग प्रमुख राजेंद्र मेहेत्रे, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, नाना गोसावी, प्रभारी मुख्य स्वच्छता निरिक्षक किशोर देशमुख, स्वच्छता निरिक्षक प्रशांत रामदिन यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मोठे ओढे व नाल्यांची सफाई झालेली आहे. मात्र, त्यातून काही भाग सुटला असल्यास तेथे तत्काळ काम सुरू करावे. वेळेवर काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर स्वच्छता निरिक्षकांनीच कारवाई करावी. चहावाले, खादय पदार्थ विकणारे हातगाडीवाले रस्त्यावर घाणपाणी किंवा कचरा टाकणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यावर प्रत्येक स्वच्छता निरिक्षकांचे बारीक लक्ष असावे, अशी ताकीद महापौर वाकळे यांनी दिली.
उपायुक्त डॉ. पठारे यांनी आरोग्य विभाग स्वच्छता निरिक्षकांकडून वार्डनिहाय कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती घेतली. दिल्लीगेट परिसरात साफसफाई वेळेवर करावी. जे आरोग्य विभागाचे कर्मचारी वेळेवर काम करित नाहीत, त्या कर्मचाऱ्यांचा अहवाल स्वच्छता निरिक्षकांनीच आस्थापनाकडे पाठविला तर कारवाई करणे योग्य होईल, अशी भूमिका मांडली.