जिल्हा बॅंकेच्या अहवालावर मोदी, फडणवीस झळकले

कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे संख्याबळ काठावर विखे, पिचडांमुळे भाजपचे 11 संचालक

नगर – पक्षीय राजकारणापासून नेहमीच अलिप्त असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलल्याने त्याचे पडसाद बॅंकेच्या वार्षिक अहवाल उमटले आहेत. यापूर्वी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे छायाचित्र असत. पण उद्या होणाऱ्या बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी छापण्यात आलेल्या वार्षिक अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र देखील झळकले आहे.

बॅंकेच्या अहवालात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपातळीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र अजून झळकत होते. पण यावेळी गांधी, पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह मोदी व फडणवीस यांचे छायाचित्र झळकल्याने सर्व पक्षीय नेत्यांच्या छबी या अहवाल दिसून आल्या आहेत. पहिल्यांदाच भाजपच्या नेत्यांचे छायाचित्र या अहवाल झळकले आहे. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे व माजीमंत्री मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे बॅंकेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ काठावर आले आहे. सध्या तरी आघाडीचे म्हणजेच जनसेवा मंडळाचे 12 तर भाजप व विखे प्रणीत परिवर्तन मंडळाचे आता 11 संचालक आहेत.

बॅंकेच्या विद्यमान संचालकांची मुदत फेब्रुवारी 2020 मध्ये संपुष्ठात येत आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपासून बॅंकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात होईल. यापूर्वी बॅंकेची निवडणूक ही थोरात गट विरूध विखे गट अशीच झाली. थोरात गटात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांशी नेते आहेत. तर विखेंच्या गटात कॉंग्रेस व भाजपचे नेते आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना मानणारे संचालक जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, दत्तात्रय पानसरे, सुरेश करपे, करण ससाणे हे संचालक सहा संचालक विखेंबरोबर भाजपमध्ये आले आहेत. त्यानंतर माजीमंत्री मधुकर पिचड भाजपवासी झाल्याने त्यांचे सुपुत्र आमदार वैभव पिचड यांच्यासह बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे देखील आता भाजपमध्ये आले आहे. यापूर्वी बॅंकेचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले, बिपीन कोल्हे, आमदार मोनिका राजळे हे तीनच संचालक होते. मात्र आता विखे गटांसह पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे आठ संचालक भाजपचे झाले आहे. परिणामी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकहाती वर्चस्वाला आता भाजपने शह दिला आहे.

बॅंकेत पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवूनच कामकाज करण्यात येते. बॅंकेच्या परंपरेला धक्‍का न लावता आतापर्यंत कामकाज झाले आहे. त्यामुळे बॅंकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. सध्या तरी आघाडीचे संख्याबळ एकने जास्त आहे. पण पुढे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे आणखी बदलली तर भाजपसह शिवसेना या पक्षाचाही जिल्हा बॅंकेत शिरकाव होण्याची शक्‍यता आहे. अर्थात यापूर्वी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून शिवसेनेचा संचालक बॅंकेत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)