Vande Bharat Metro – वंदे भारत ट्रेननंतर आता देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वंदे भारत मेट्रो धावण्याच्या तयारीत आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेनची पहिली झलकही समोर आली आहे. या विशेष मेट्रो ट्रेनची चाचणी यावर्षी जुलैपासून घेतली जाणार आहे. पंजाबमधील कपूरथला येथील एका रेल्वे कोच कारखान्याने वंदे भारत मेट्रोचे पहिले काही डबे तयार केले आहेत.
🚨 First Vande Metro train rolled out from ICF Chennai today. (📹-@trainwalebhaiya) pic.twitter.com/SWQuEoQ5kC
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) April 30, 2024
अहवालानुसार, सुरुवातीला अशा 50 गाड्या बनवल्या जातील आणि हळूहळू त्यांची संख्या 400 पर्यंत वाढवली जाईल. वंदे भारत मेट्रो 100 किमी ते 250 किमी दरम्यान धावतील. त्यात डिफॉल्ट कॉन्फिगरेशन म्हणून 12 कोच असतील, परंतु ते 16 डब्यांपर्यंत वाढवता येतील.
वंदे भारत ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे. ती 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यान रवाना झाली होती. आज 102 वंदे भारत ट्रेन 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 284 जिल्ह्यांमधून 100 मार्गांवर धावतात.
मुंबई लोकल ट्रेनची जागा घेणार वंदे भारत मेट्रो –
येत्या तीन ते चार वर्षात मुंबईच्या लोकल ट्रेनच्या जागी वंदे भारत मेट्रो ट्रेन येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील दैनंदिन प्रवाशांना मेट्रोच्या धर्तीवर एसी आणि स्वयंचलित गेटसह सुरक्षित सेवा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, वंदे भारत मेट्रो ट्रेनचा पहिला रेक कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये जवळजवळ तयार आहे. वंदे भारत मेट्रोचे 50 रेक तयार झाल्यानंतर आणखी 400 रेक तयार करण्याचे आदेश दिले जातील. वंदे भारत मेट्रो देशातील 12 मोठ्या आणि मध्यम शहरांमध्ये दररोज प्रवासाची सुविधा देईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन ही 12 डब्यांची ट्रेन असेल जी गरज भासल्यास 16 डब्यांपर्यंत वाढवता येईल. काही सेकंदात अतिवेगाने धावणारी ही मेट्रो ट्रेन असेल. दोन प्रमुख स्थानकांदरम्यान सरासरी 125 किलोमीटर अंतर असलेल्या अनेक फेऱ्यांमध्ये धावण्याची योजना आहे. सूत्रांनी सांगितले की, भविष्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई आदी महानगरांतील उपनगरीय सेवेत धावणाऱ्या गाड्यांचे रूपांतर वंदे भारत मेट्रोमध्ये केले जाऊ शकते, यामुळे दैनंदिन प्रवाशांना हायस्पीड ट्रेनची सुविधा मिळेल.