Telangana news : निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि BRS अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (k chandrashekhar rao) यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. के. चंद्रशेखर राव यांना 48 तासांसाठी प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही तात्पुरती बंदी आज रात्री 8 वाजतापासून सुरू होणार आहे. काँग्रेस नेते जी. निरंजन यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. के. चंद्रशेखर राव यांच्यावर काँग्रेसविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.
निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आदर्श आचारसंहिता भंग केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त विधानाचा तिव्र निषेध करण्यात येत आहे. घटनेच्या कलम 324 चा हवाला देत आयोगाने के चंद्रशेखर राव यांना आज रात्री 8 वाजल्यापासून 48 तासांसाठी कोणतीही जाहीर सभा, सार्वजनिक मिरवणूक, सार्वजनिक रॅली, कार्यक्रम आणि मुलाखती, मीडिया (इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया) मध्ये जाहीर भाषण करण्यास मनाई केली आहे.