विसर्जन मिरवणुकीत माय-लेकीवर कोयत्याने वार

कोथरूड परिसरातील घटना : 10 वर्षांपूर्वीचा वाद

पुणे – गणेश विसर्जन मिरवणूक पाहणाऱ्या तरुणीसह तिच्या आईवर एकाने कोयत्याने वार केले. तरुणीने दोन्ही हातावर वार झेलल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला वाचविणाऱ्या आईवरही वार झाले आहेत. कोथरूड परिसरात गुरूवारी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दहा वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून वार केल्याचे उघडकीस आले.

काशिनाथ तुकाराम मुळुक (55, रा. गावडे बिल्डिंग, त्रिमूर्ती कॉलनी, आझादवाडी, कोथरूड) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात स्नेहा पवार (21, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि त्यांची आई मनीषा या कोथरूडमधील गणेश रेसिडेन्सी इमारतीसमोरील गणपती विसर्जन मिरवणूक पाहत उभा होत्या. या वेळी आरोपी काशिनाथ तेथे आला. त्याचा दहा वर्षांपूर्वी पवार कुटुंबीयासोबत कचरा टाकण्यावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून आरोपीने स्नेहावर वार केले. मुलीस वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या मनीषा यांच्या डोके तसेच हातावर वार केले. हा प्रकार मिरवणूक जात असताना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांनी दोघींनाही रुग्णालयात नेले. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पी.एन.जर्दे हे करीत आहेत.

केळेवाडीत ज्येष्ठ महिलेवर कोयत्याने हल्ला
केळेवाडीतही विसर्जन मिरवूणूक पाहणाऱ्या एका महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले. ही महिला मुलीला घेऊन थांबली होती. यावेळी हातात कोयता घेऊन जात असलेला एक तरुण “आता मुडदाच पाडतो’ असे म्हणत मिरवणुकीत जात होता. त्याला तिने समजाऊन सांगत असताना राग आला. या रागाच्या भरात त्याने फिर्यादी शिलाबाई फाले (65, रा. कोथरुड) हिच्यावर वार केले. त्यांच्या नाकास व चेहऱ्याच्या उजव्या बाजूस लागले. यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वप्नील शंकर धनवे (22, रा. सुतारदरा, कोथरूड) यास पोलिसांनी अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.