पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी दिली. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे नुकतीच मतदारसंघातील निवडक कार्यकर्त्यांची बैठकी घेतली.
मतदारसंघातील सद्य परिस्थिती, विकासाबाबत अडीअडचणी, प्रलंबित पारंपरिक प्रश्न, दुष्काळी परिस्थिती व त्यावरील उपाययोजना, उपलब्ध पाणलोट क्षेत्राची माहिती घेऊन विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची व कार्यकर्त्यांची असणारी तयारी, पक्षातील व पक्षाबाहेरील संभाव्य इच्छुक उमेदवारांची नावे यावर विस्तृत चर्चा होऊन त्यानंतर या मतदारसंघामध्ये येणारी विधानसभा निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. मतदारसंघात प्रत्येक बुथनिहाय गटप्रमुखांची नेमणुक करून त्यांना गट अध्यक्ष असे स्वतंत्र पद दिले आहे. पक्षाने प्रत्येक गावात बुथपातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी केलेली आहे, असे ते म्हणाले.