विजय शिंदे
वडापुरी – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्रोत्सवादरम्यान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास माजी राज्यमंत्री व अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असून महाविकास आघाडी सरकारमध्येही पुणे जिल्ह्यातून अजित पवार, दिलीप वळसे पाटील व दत्तात्रय भरणे यांना मंत्रीपदाची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिली होती. धनगर समाजाचे ते विधानसभेतील एकमेव आमदार असून ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पुणे ग्रामीणमधून सर्वाधिक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले असून दत्तात्रय भरणे हे सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला अजित पवार गटाकडून तिसरे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे.
मित्रपक्षांपेक्षा जास्त आमदार असतानाही युतीतील घटक पक्षांएवढीच मंत्रिपदे असल्याने भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून राहुल कुल, माधुरी मिसाळ, महेश लांडगे, उमा खापरे यांच्या नावाचीही भाजपकडून चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच दिल्लीत भाजपश्रेष्ठींना भेटले होते. त्यावेळी श्रेष्ठींनी विस्ताराला हिरवा झेंडा दाखविला असल्याचे म्हटले जाते. आगामी निवडणुकांत याचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.
आणखी 14 जणांना संधी?
मंत्रिमंडळात सध्या 29 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात भाजपचे 10, शिंदे यांच्या शिवसेनेचे 10 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 9 मंत्री आहेत. मंत्र्यांची संख्या 43 पेक्षा जास्त होऊ शकत नसल्याने आणखी चार कॅबिनेट मंत्र्यांसह 14 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.