Milind Deora join Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे गटातील अनेक नेतेमंडळी देखील उपस्थित होते.काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे मिलिंद देवरा हे पुत्र आहेत. पक्ष प्रवेशावेळी देवरा यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पक्षात येण्याचं आमंत्रण का दिल याबाबत खुलासा केला.
शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आपले वडील यांच्याबाबतच्या आठवणी देखील जागवल्या. तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि आपले वडील मुरलीभाई हे ग्राउंड लेव्हलवरून मोठे झालेले व्यक्तिमत्त्व असल्याचे देखील देवरा यांनी यावेळी सांगितलं. आपल्या भाषणात बोलताना देवरा यांनी काँग्रेस का सोडली याबाबत देखील खुलासा केला.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव. काँग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख.ठाकरेंनी दक्षिण मुंबईवर दावा सांगितल्याने मिलिंद देवरा नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. अशात आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत देवरा यांनी पक्षात प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.
मिलिंद देवरा म्हणाले,”माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी शिंदे साहेबांनी मला पक्षात येण्याचं आमंत्रण का दिल हे मी या व्यासपीठावरून सांगू इच्छितो. एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे चांगलेच लोक हवे आहेत. मी खासदार होऊन मुंबई, महाराष्ट्र तसेच एकनाथ शिंदे यांच्या पक्ष व्हिजनचे नेतृत्व करू शकतो असं त्यांचं आणि श्रीकांत शिंदे यांचे मत आहे” असं देवरा यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच देवरा यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे आभार देखील मानल
अशी आहे देवरा यांची राजकीय कारकीर्द
मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील मुरली देवरा हे ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेस नेते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले. 15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरांना ओळखलं जायचं. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले. मिलिंद देवरा यांनी २०१२ ते २०१४ या काँग्रेस कार्यकाळात केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही होते.