लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील एका सभेत बोलताना समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस यांनी आपसात संगनमत करून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना फसवले असून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप काल केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज मायावती यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अमेठी व रायबरेली मतदार संघातून विजयी करा असे आवाहन आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला भाजप आणि कॉंग्रेस दोन्हीही सारखेच आहेत. पण आता पहिले उद्दीष्ठ भाजपला पराभूत करणे हे आहे. त्यामुळे अमेठी व रायबरेलीतील मतदारांनी कॉंग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना मतदान करून विजयी केले पाहिजे.
उत्तरप्रदेशातील चार टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मोठे यश मिळाले असून त्यामुळे भाजपचे नेते आता अस्वस्थ झाले आहेत. आमच्या या आघाडीमुळे केवळ केंद्रात नवीन पंतप्रधान सत्तेवर तर येतीलच पण उत्तरप्रदेशातही नवीन सरकार आता अस्तित्वात येईल असा विश्वासही मायावती यांनी व्यक्त केला आहे. येत्या 23 तारखेला केंद्रातील हुकुमशाही प्रवृत्तीच्या अहंकारी सरकारच्या तावडीतून देश मुक्त होईल असा विश्वासही मायावती यांनी एका निवेदनात व्यक्त केला आहे.