दिल्ली वार्ता: आपापला गड राखण्याचे आव्हान

वंदना बर्वे

ज्यांचा पराभव पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे आसुसलेले आहेत; त्या कॉंग्रेसचे आजी-माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भाग्याचा आज फैसला करण्याचा दिवस आहे. अमेठी आणि रायबरेलीसह उत्तरप्रदेशातील 14 मतदारसंघात मत टाकले जात आहे. पाचव्या टप्प्याच्या या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसच्या गडात निवडणूक होत असल्याने दोन्ही पक्षांची आज सत्त्वपरीक्षा आहे, असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही.

अमेठी आणि रायबरेली कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे तर अयोध्या आणि लखनऊ भाजपचे शक्‍तिपीठ. आपापला गड राखण्यासोबतच विरोधकाला त्यांच्या बालेकिल्ल्यात चीत करण्यासाठी दोन्ही पक्षांनी बेंबीच्या देठापासून जोर लावला आहे. मात्र, प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची.
राहुल गांधी यांना पराभूत झाल्याचे पाहण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे डोळे आसुसलेले आहेत. मोदींनी 2013 पासून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीच्या मोहिमेवर पाठविले आहे. 2014 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी 4,08,651 मते मिळवून स्मृती इराणी यांचा 57,716 मतांनी पराभव केला होता. आता त्या पुन्हा मैदानात आहेत.

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधूनही लढत असल्यामुळे अमेठीची निवडणूक रोमांचक झाली आहे. खरे सांगायचे झाले तर, नरेंद्र मोदी नावाची लाट जी 2014 मध्ये होती ती आता राहिलेली नाही. यामुळे राहुल गांधी यांच्यापुढे स्मृती इराणी यांचा निभाव लागणार की नाही? की इराणी कॉंग्रेसच्या गडाला भगदाड पाडतात? हा प्रश्‍नच आहे. अमेठी म्हणजे अवधचा एक भाग. अमेठीच्या कोणत्याही गल्लीत, कोणत्याही मोहल्ल्यांत गेले तरी गांधी कुटुंबाच्या कथा ऐकायला मिळतील. कोणत्याही मुलाची भेट घेतली तरी तो संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी किंवा राहुल वा प्रियांका गांधी यांच्यापैकी कुणाची तरी आठवण नक्‍की सांगू शकेल. कधी हात मिळविला असेल किंवा कधी बोलले असतील. नाही काही तर एखाद्याला प्रत्यक्ष बघितल्याची तरी आठवण प्रत्येकाजवळ सापडते.

संजय गांधी यांनी 1975 मध्ये खेरौना गावात श्रमदान करून अमेठीशी नाते जोडले होते. तेव्हापासून आतापर्यंत अमेठी आणि गांधी एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्यामुळे अमेठी देशातील व्हीव्हीआयपी सीट आहे. हा दर्जा कायम राहावा असे काही जणांना वाटते. तर काहींच्या मते व्हीव्हीआयपी सीट असूनही अमेठीचा व्हायला पाहिजे तसा कायापालट झाला नाही. राहुल गांधी अमेठीला कमी वेळ देतात अशीही तक्रार आहे. मात्र, पराभूत झाल्यानंतरही स्मृती इराणी सारख्या अमेठीला येत राहतात. केंद्रीय मंत्री असूनही इराणी यांनी अमेठीकडे जसे लक्ष द्यायला हवे होते तसे अजिबात दिलेले नाही असाही एक सूर आहे. मात्र, अमेठीचा कोणताही माणूस दिल्लीला आला आणि अमेठीहून आलो असे सांगितले तर 10 जनपथ येथे लगेच सुनावणी होते असा अनेकांचा अनुभव आहे.

अमेठी म्हणजे कॉंग्रेसचा गड. 1977 पासून आतापर्यंत गांधी कुटुंबातील सदस्याने दहा निवडणुका लढविल्या आणि यापैकी नऊ वेळा कॉंग्रेस जिंकली आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे धाकटे चिरंजीव संजय गांधी 1977 मध्ये अमेठीतून पराभूत झाले आणि 1980 मध्ये विजयी झाले. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर 1981 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले. यानंतर 1984, 1989 आणि 1991 या निवडणुकांमध्ये राजीव गांधी यांनी विजय मिळविला. सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढविली आणि जिंकून आल्या. यानंतर राहुल गांधी 2004 पासून आतापर्यंत अमेठीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 1998 मध्ये संजय सिंग येथून विजयी झाले होते. राहुल गांधी आहे म्हणून स्मृती इराणी अमेठीत आल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यातील सामना रंगतदार झाला नाही तरच नवल! नरेंद्र मोदी नावाची लाट विरली आहे आणि राहुल गांधी राजकीयदृष्ट्या मॅच्युअर झाले आहेत. अशात अमेठीतील 16 लाख 69 हजार 843 मतदार कुणाची निवड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ म्हणजे रायबरेली. सोनिया गांधी यांच्या विरोधात एकही तगडा उमेदवार नाही. समाजवादी पक्षाने रायबरेलीत आपला उमेदवार उभा केलेला नाही. भाजपने कॉंग्रेसमधून आलेले आमदार दिनेश प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दिनेश सिंग यांचे नाव सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये घेतले जायचे; परंतु त्यांनी मागच्या वर्षी भाजपची सदस्यता घेतली. या ठिकाणी लढत एकतर्फी आहे असे म्हणायला हरकत नाही.

रायबरेलीशी गांधी-नेहरू कुटुंबाचा संबंध शंभर वर्षे जुना आहे. इंग्रजांच्या राजवटीत पंडित नेहरू 1921 मध्ये रायबरेलीला आले होते. पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचा विरोध करण्यासाठी ते गेले होते. यानंतर 1952 मध्ये फिरोज गांधी रायबरेलीतून खासदार म्हणून निवडून गेले. 1957 मध्ये पुन्हा जिंकले. फिरोज गांधी यांच्यानंतर रायबरेलीचे नेतृत्व इंदिरा गांधी यांनी केले. 1977 मध्ये राज नारायण यांच्या हातून पराभूत झाल्यानंतर 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी दोन ठिकाणाहून निवडून आल्या. यानंतर त्यांनी हा मतदारसंघ अरूण नेहरू यांच्या स्वाधीन केला. सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये अमेठीतून लढत राजकारणात प्रवेश केला. नंतर त्या रायबरेलीत आल्या. लाभाच्या पदामुळे सोनिया गांधी यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सोनिया गांधी चार लाख 18 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. 2009 च्या निवडणुकीत भाजपच्या अजय अग्रवाल यांना फक्‍त 25000 आणि 2014 मध्ये फक्‍त एक लाख मते मिळाली होती.

नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या लखनऊचा थाटसुद्धा नवाबीच! लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत नेहरू कुटुंबातील पंडित विजयालक्ष्मी यांना लोकसभेत पाठविणाऱ्या लखनऊकरांची निवड फार भारी राहिली आहे. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी 1991 मध्ये लखनऊ जिंकले होते. तेव्हापासून ही सीट भाजपजवळ आहे. भाजपने गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मैदानात उतरविले आहे तर सपा-बसपाने शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना तसेच कॉंग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांना मैदानात उतरविले आहे. 2014 च्या निवडणुकीत राजनाथ सिंग यांना 561106 मते मिळाली होती. कॉंग्रेसच्या रिता बहुगुणा यांना 188357 मते मिळाली होती.

लखनऊतील जातीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर, ब्राह्मण (426000), कायस्थ (395000), क्षत्रीय (177000), कुर्मी (167000), मुस्लिम (450000), एससी (एक लाख), वैश्‍य, पंजाबी आणि सिंधी (12000) मतदार आहेत. लखनऊमध्ये मुस्लिम मतदार नेहमीच निर्णायक राहिला आहे. सध्या साडे चार लाख मुस्लिम मतदार आहेत.

अयोध्या म्हणजे फैजाबाद लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या पाच जागा आहेत. यात अयोध्या, रूदौली, मिल्किपूर, बिकापूर आणि दरियाबाद बाराबंकीचा समावेश होतो. 2014 मध्ये भाजपचे लल्लू सिंग यांनी चार लाख 91 हजार 761 मते मिळवून विजय मिळविला होता. 2014 मध्ये होती तशी मोदी नावाची लाट आता राहिली नसल्यामुळे लल्लू सिंग यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सपाने येथून आनंदसेन यादव यांना तर कॉंग्रेसने डॉ. निर्मल खत्री यांना रिंगणात उतरविले आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या निवडणुकीत राम मंदिर भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. यामुळे सगळी बिसाद रामभरोसे आहे. जातीय समीकरणाविषयी बोलायचे झाले तर, 46 टक्‍के ओबीसी मतदार आहेत. 20 टक्‍के ब्राह्मण, 21 टक्‍के अनुसूचित जाती आणि 13 टक्‍के मुस्लीम मतदार आहेत. पाचव्या टप्प्यातील व्हीव्हीआयपीसह 14 मतदारसंघामध्ये आज होत असलेल्या मतदानाचा निकाल 23 मे रोजी येईल तेव्हा नवाबांच्या शहराने कुणाला नवाब बनविले हे कळेल!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.