Eknath Shinde – नेहमीची चाकोरी मोडण्यासाठी नाट्यसृष्टीत वेगवेगळे धाडसी प्रयोग होत असतात. अभिनेते म्हणून ते प्रयोग तुम्ही करत असता. त्याप्रमाणेच राजकारणातही आम्ही धाडसी प्रयोग केला आहे. दीड वर्षापूर्वी आम्ही सत्तांतराचा प्रयोग केला. त्याची इतिहासात नोंद होणार आहे. आम्ही केलेला प्रयोग हे चांगले कथानक असून त्यावर चित्रपट बनवा, अशी कोपरखळी मारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हशा पिकविला.
पिंपरी-चिंचवड येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी त्यांनी राजकीय कोपरखळ्या मारून उपस्िथतांमध्ये हशा पिकविला. या वेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार, खा. श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार आण्णा बनसोडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल, प्रेमानंद गज्वी,
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोइर, डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह,कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला आदीसह नाट्यकलेतील अभिनेते, कलावंत या वेळी उपस्िथत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, २०२० रोजी होणारे शंभरावे नाट्यसंमेलन करोनामुळे झाले नाही. सध्या ते पिंपरी-चिंचवड शहरात तेही माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे. हे मी माझे भाग्य समजत असलो तरी नियतीला देखील माझ्याच हातून उद्धाटन व्हावे असे वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तम कला सादर केल्यानंतर प्रेक्षक कलाकारांना टाळ्या वाजवून दाद देतात. त्याप्रमाणेच आम्ही चांगले काम केल्यानंतर मतदार आम्हाला मतपेटीतून मते देतात. त्यामुळे दोघांनाही कष्ट चुकलेले नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दीड वर्षापुर्वी आम्ही सत्तांतराचा पहिला अंक रचला. कामांच्या माध्यमातून दुसरा अंक सुरू आहे. आता आगामी निवडणूकीला सामोरे जाऊन विजय संपादन केल्यानंतर तसरा अंक रचणार आहे. धर्मवीर चित्रपट बनविल्याने मी देखील तुमच्यामधीलच असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्याचा दुसरा भाग येत आहे. तीसऱ्या भागाबद्दल विचारल्यानंतर तुम्हीच तो बनवा असे मी जब्बार पटेल यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताच एकच हशा पिकला.