Mayawati – उत्तरप्रदेशच्या सर्व ७५ जिल्ह्यांत बसप १५ जानेवारीला मेळाव्यांचे आयोजन करणार आहे. त्या माध्यमातून बसपच्या प्रमुख मायावती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्ष शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने बसप मायावतींच्या वाढदिवशी उत्तरप्रदेशातील जनतेपर्यंत पोहचणार आहे. त्या दिवशी बसप बहनजी ॲपही लॉन्च करणार आहे. त्याविषयीची माहिती बसपचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या आघाडीची स्थापना केली आहे. बसपलाही साथीला घेण्यासाठी ती आघाडी प्रयत्नशील आहे. मात्र, त्या पक्षाने अद्याप प्रतिसाद दिला नसल्याचे समजते.
त्या पाश्वर्भूमीवर, पाल यांना इंडियाशी निवडणूक समझोता करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पक्षाचे सर्व निर्णय मायावती घेतात. त्यांचा निर्णय आम्ही स्वीकारू, असे उत्तर त्यांनी दिले. त्यातून त्यांनी इंडियाशी हातमिळवणी होणार की नाही याचा सुगावा लागू दिला नाही.