पुणे – लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात मेजर दर्जाच्या पदावरील दिल्ली येथील वसंत विजय किलारी (वय 45, दिल्ली, मूळ. आंध्र प्रदेश) याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष एस.आर.नावंदर यांनी दिला आहे.
तामिळनाडू येथून अटक केलेला थिरू मगरून थंगवेल याने व्हॉटसअपवरून लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका लिक केली होती. थिरू याला वसंत यानेच ती प्रश्नपत्रिका पाठविली आहे. त्याने ती कुठून मिळविली, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली.
थिरू मुरुगन थंगवेलू (वय 47, रा. तमिळनाडू), किशोर महादेव गिरी (वय 40 , रा. बारामती), माधव शेषराव गिते (वय 39, रा. सॅपिअर विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय 39, रा. दिघी), उदय दत्तू औटी (वय 23, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय 37, रा. पाचोरा) या सहा जणांना या प्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. त्यापैकी किशोर, माधव आणि उदय हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित तिघे पोलीस कोठडीत आहेत. तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल आहे.
लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत गेल्या आठवड्यात पुण्यासह देशात 43 ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील 40 हजार उमेदवार बसले होते. मात्र, या परिक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.