नगर – नवनागापूर येथील छत्रपतीनगर परिसरात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला शनिमारुतीचा चौथरा ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने पाडला. ही घटना सोमवारी (दि.२२) घडली. नवनागापूरचे सरपंच डॉ. बबन डोंगरे व अनिल डोंगरे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह आणखी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सागर रावसाहेब चौथे (रा. छत्रपतीनगर, नवनागपूर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉलनीत खुला भूखंड आहे. या भूखंडावर नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून चौथरा बांधून त्यावर शनिमारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. हा परिसर नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. इथे शाळा बांधायची आहे. तुम्ही अनाधिकृतरीत्या चौथरा बांधला आहे. तो तोडून टाकीन, अशी धमकी दिली होती. याबाबत नागरिकांनी तक्रार दिली नव्हती. मात्र, त्यांनी पुन्हा सोमवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने चौथरा पाडून टाकला आहे. तसेच, याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास तुमचे पाणी बंद करून टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.