पुणे – राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेत महराष्ट्राच्या सायकलपटूंनी आपली छाप पाडली. मुलींच्या सब-ज्युनियर गटात पूजा दानोळेने मिळविलेल्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राने 3 रौप्यपदके आणि एक ब्रॉंझपदकही मिळविले.
नवी मुंबईत पनवेल येथे पार पडलेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजाने आपली तयारी दाखवून देताना ताशी 35.96 कि.मी. वेगाने सायकलिंग करताना 10 कि.मी. टाईम ट्रायल शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. तिने 16 मिनिटे 41.087 सेकंद वेळ दिली. याच शर्यतीत अपूर्वा गोरेने महाराष्ट्राला ब्रॉंझपदक मिळवून दिले. हरियाणाची रुचिका सिंग रौप्यपदकाची मानकरी ठरली. पूजाने गेल्या वर्षी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली होती.
तसेच संग्राम यादव, वरद पाटील आणि मधुरा वायकर यांनी रौप्यपदके मिळवून दिली. संग्राम पुरुषांच्या 10 कि.मी. शर्यतीत रौप्यपदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील सुवर्ण आणि ब्रॉंझपदक अनुक्रमे मोहमिस आणि परवेझ या जम्मू-काश्मीरच्या सायकलपटूंनी मिळवले.
मुलांच्या सब-ज्युनियर गटात 20 कि.मी. अंतराच्या शर्यतीत महाराष्ट्राचा वरद पाटील हरियाणाच्या निरज कुमारला आव्हान देऊ शकला नाही. निरजने 27 मिनिटे 47.077 सेकंद वेळ देत सुवर्णपदकाचा मान मिळविला. त्याचा सायकलिंगचा वेग ताशी 43.19 कि.मी. इतका राखला होता. वरदने 28 मिनिट 35.427 सेकंद अशी वेळ दिली. त्याचा वेग ताशी 41.97 कि.मी. इतका होता. हरियाणाचा गुरनूर पुनिया ब्रॉंझ पदकाचा मानकरी ठरला.
महाराष्ट्राला तिसरे रौप्य महिलांच्या 20 कि.मी. टाईम ट्रायल शर्यतीत मधुरा वायकरने मिळवून दिले. रेल्वेची मेघा गुगड सुवर्णपदकाची मानकरी ठरली. मेघा आणि मधुरा दोघींच्या वेगात किंचीत फरक होता. तसा त्यांच्या वेळेतही अगदी काही मिनिटाचा फरक पडला.
मेघाने ताशी 37.11, तर मधुराने 37.10 कि.मी. वेग राखला होता. मेघाने 50 मिनिटे 20.406 सेकंद अशी वेळ दिली. मधुराची वेळ 49 मिनिटे 20.772 सेकंद अशी राहिली.
अन्य निकाल –
पुरुष (टाईम ट्रायल 40 कि.मी.) – नवीन जॉन (कर्नाटक, 53 मिनिटे 35.533 सेकंद), मनजित सिंग (सोनादल), हर्षवीर सिंग सेकॉन (पंजाब)
युवा मुली (टाईम ट्रायल, 10 कि.मी.) – हर्षिता जाखर (राजस्थान, 16 मिनिट 58.075 सेकंद), अनुपमा गुलेड (कर्नाटक), धन्यदा जे.पी. (तमिळनाडू)