महायुतीला ऐतिहासिक यश मिळेल : जावडेकर

विरोधकांवर शरसंधान : विकासकामांमुळे जनता पाठिशी असल्याचा दावा

पुणे – केंद्र आणि राज्यात विरोधकांची राजकीय आणि वैचारिक दिवाळखोरी दिसून येत आहे. कॉंग्रेस तर विरोधालादेखील उरलेली नाही. राष्ट्रवादी फक्त महाराष्ट्रापुरती होती. ती आता पश्‍चिम महाराष्ट्रात राहिली आहे. जो पक्ष या निवडणुकीत 25 उमेदवार लढवत आहे, तो विरोधी पक्ष करा म्हणतो. राज्यातील राजकीय पक्षांची सध्यांची अवस्था पाहता महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जावडेकर यांच्या प्रचार रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्यात गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे जनतेचा आमच्यावरील विश्‍वास वाढला आहे. त्यामुळेच आम्हाला केंद्रात भरघोस यश मिळाले आहे. या यशाला काहीजण पाशवी असे संबोधतात. पण, असे म्हणणे हा जनमताचा अपमान आहे, असे ही जावडेकर यांनी स्पष्ट केले.

“एनआरसी’ असेल, अथवा राममंदिर किंवा जीएसटी, या प्रत्येकवेळी कॉंग्रेस दुटप्पी भूमिका घेत आहे. काश्‍मीर प्रश्‍नाचे राजकारण केले जाते. 370 कलम हटवण्याच्या बाजूने संसदेत मतदान करतात आणि भाषणात मात्र प्रचंड विरोध केला जातो. राष्ट्रवादीला तर कुठली भूमिका असल्याचे दिसत नाही. राष्ट्रवाद हा प्रमुख मुद्दा आहे, तर विकास हा आमचा संकल्प आहे. त्यामुळे राष्ट्राच्या ऐक्‍याशी तडजोड होऊ शकत नाही. विकासाचा आमचा रोडमॅप तयार आहे. त्याचे काम सुरू आहे, असेही जावेडकर यांनी सांगितले.

पुणे शहरात नाही, तर आज अनेक शहरांमध्ये थोडा जास्त पाऊस झाला तरी पूर येतो. त्यासाठी पुराचे योग्य व्यवस्थापन होणे गरजचे आहे. ओढे, नदी, नाल्यांवर झालेली अतिक्रमणे हटवली पाहिजेत. ही जबाबदारी राज्यांची आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंदी लवकरच हटेल

जगातच सध्या मंदीचे वातावरण आहे. हे चक्र आहे. दर दहा ते बारा वर्षांनी ते येत असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत याबाबत चर्चा होत आहे.लवकरच सर्व पूर्ववत येईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.