उमेदवारांचा लेखाजोखा

भोसरीत एका उमेदवाराने दिला नाही हिशोब

पिंपरी – विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. एकीकडे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावायची, कार्यकर्त्यांची फौज संभाळायची. हे सगळे करत असताना निवडणूक आयोगाने निश्‍चित करुन दिलेला मर्यादेतच खर्च करायचा, अशी कसरत शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवारांना करावी लागत आहे. अर्ज भरल्यापासून आतापर्यंतचा सर्व खर्च पहिल्या टप्प्यात शुक्रवारी उमेदवारांनी निवडणूक विभागास सादर रात्री केला. रात्री उशिरापर्यंत उमेदवारांच्या नोंदवह्यांची तपासणी करत अधिकाऱ्यांनी चोख हिशोब घेतला.

भोसरी विधानसभा मतदार संघातील 12 पैकी एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादरच केला नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहनवाज शेख यांनी पहिल्या टप्प्यातील खर्चाचा हिशोब निवडणूक विभागाला सादर केला नाही. तर भाजप महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळून आली. ही तफावत लांडगे यांनी मान्य केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच उमेदवार प्रचाराला लागले. या प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा निश्‍चित करुन दिली आहे. या मर्यादेतच उमेदवारांना आपला खर्च करायचा आहे. निवडणूक आयोगाच्या मर्यादेत खर्च बसविण्यासाठी उमेदवारांकडे असलेल्या आर्थिक तज्ज्ञांचे पथक तारेवरची कसरत करीत आहे. उमेदवारांना निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी तीन वेळा खर्चाची माहिती सादर करावी लागणार आहे. उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये व्हिडीओ सर्व्हिस टीम (व्हीएसटी) गठित करण्यात आली आहे. ही टीम प्रत्येक उमेदवाराच्या सभा व प्रचाराचे चित्रीकरण करत आहेत. तर उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची उलट तपासणी निवडणूक आयोगाच्या यंत्रणा (एसओआर) करत आहेत.

भोसरी विधानसभेसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील निवडणूक खर्च सादर केला आहे. त्यानुसार भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी सर्वाधिक 2 लाख 40 हजार 592 रुपये खर्च केला आहे. लांडगे यांनी 1 लाख 96 हजार 492 रुपयांचा खर्च नोंदविला होता. परंतु, एसओआरच्या तपासणीत खर्चात 1 लाख 58 हजार 81 रुपयांची तफावत आढळून आली. ही तफावत लांडगे यांनी मान्य केली आहे. आमदार लांडगे यांच्या खालोखाल अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी 84 हजार 555 रुपयांचा खर्च झाल्याचे म्हटले आहे. उर्वरीत उमेदवारांचा खर्च 20 हजार रुपयांच्या आत झाला आहे. महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊसाहेब अडागळे यांनी सर्वात कमी 5 हजार रुपयांचा खर्च केल्याचे नमूद आहे. हिशोब न देणाऱ्या उमेदवाराबाबत निवडणूक विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.