मुंबई – आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा येथील विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या असून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून पोटनिवडणूक लढवण्यात येणार असल्याचे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जयंत पाटलांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
जयंत पाटील म्हणाले, कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक महाविकास आघाडी संयुक्तरित्या लढवणार आहे. या निवडणुकीत कोणाला कोणती जागा द्यायची याबाबत महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाशी सल्लामसलत केली जाईल. पक्षातील वरिष्ठांचा सल्ला घेतला जाईल. त्यानंतर चर्चेअंती निर्णय जाहीर केला जाईल. याबाबत उद्यापर्यंत निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, पंढरपूर पोटनिवडणुकीचे उदाहरण देत महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार, या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केला जाणार असून येथे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे निश्चित मानले जात आहे.
PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च
दरम्यान, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाचपैकी एकाच मतदारसंघात भाजपाला यश मिळाले. तीन ठिकाणी महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला असून कॉंग्रेसने निलंबित केलेले नेते सत्यजीत तांबे यांनी अद्यापही त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. एकंदरीतच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याने त्यांचा उत्साह दुणावला आहे.