नवी दिल्ली – वर्ष 2019 पासून आतापर्यंत राष्ट्रपतींच्या परदेश दौऱ्यांसाठी 6,24,31,424 रूपये, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांसाठी 22,76.76,934 रूपये आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर 20,87,01,475 रुपये खर्च झाले असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी संसदेत एका लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
पंतप्रधानांचे 2019 नंतर झालेले दौरे आणि परदेशातून आलेल्या पाहुण्यांच्या संदर्भातील माहिती सरकारकडून सांगण्यात आली. त्यानुसार 2019 पासून आतापर्यंत राष्ट्रपतींनी 8 परदेश दौरे केले आहेत. त्यावर 6.24 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी 21 तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या काळात 86 परदेश दौरे केले आहेत.
2019 नंतर पंतप्रधान तीन वेळा जपान, दोन वेळा अमेरिका आणि एकसा संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेले होते. याशिवाय कोरिया, मालदिव, श्रीलंका, किर्गिस्तान, भुतान, फ्रान्स, बहरिन, रशिया, थायलंड, ब्राझिल, इटलीसह अन्य देशांना पंतप्रधानांनी भेट दिली आहे.
या काळात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या 7 तर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची एक विदेश यात्रा झाली आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी मुर्मू सप्टेंबमध्ये ब्रिटनला गेल्या होत्या.