मुंबई – राष्ट्रवादीत (ncp) बंड करुन अजितदादांसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्या पाठीमागे महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा ससेमिरा पुन्हा लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी छगन भुजबळांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार, विधिमंडळात दिलेल्या आश्वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार ? अशी विचारणा करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर सत्र न्यायालयाने भुजबळ, त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Samir Bhujbal) आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे (Maharashtra sadan ghotala) विकसक मेसर्स चमणकर यांना दोषमुक्त केले होते. मात्र, या निकालावर अंजली दमानियांनी आक्षेप घेतला होता. अंजली दमानिया यांनी सरन्यायाधीशांकडे याबाबत तक्रार केली होती. दमानियांचे म्हणणे होते की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या कथित गैरव्यवहाराबाबत तक्रारी प्रलंबित असून तपास सुरू होता. तरीही सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भुजबळ, विकसक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना केले. दमानिया यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात संबंधित न्यायाधीशांची बदली केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाने या संदर्भात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र, नंतर तो शासननिर्णयही रद्द केला होता.
सत्तेचा भाग झाल्यानंतर चौकशी थांबत तर नाही ना, असा प्रश्नही दमानियांनी केला आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार, सेंट्रल लायब्ररी, इंडिया बुल्स, तुलसी को ऑपरेटिव्ह गैरव्यवहार, हेक्स वर्ल्ड स्कॅम यांच्या संदर्भातील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करा, या दमानियांच्या मागणीची प्रवर्तन संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू असून त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न दमानियांनी केला आहे.
फडणवीसांनीही दिले होते आश्वासन
भुजबळांविरोधातील आरोपांचा मुद्दा विधानसभेतही आला होता. भुजबळांची चौकशी कधी सुरू करणार, असा प्रश्न आमदार सुहास कांदे यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी विधानसभेत केला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सॉलिसिटर जनरल यांचे मत घेतले जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले. मात्र, त्याबद्दल कोणतीही घडामोड झालेली नाही. आता तर छगन भुजबळ भाजपसोबतच सत्तेत सहभागी झाले आहेत.