World Cup IND vs AUS 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (रविवार) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दिलेले 200 धावांचे माफक आव्हान चेस करताना भारतीय फलंदाजांची दमछाक होताना दिसतेय. पहिल्या चेंडूपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाज भेदक मारा करत असून कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर व ईशान किशन या भारतीय फलंदाजांना तंबूत धाडले आहे. भारताचे हे पहिले तीनही फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. डावाच्या सुरुवातीलाच पडझड झाल्याने विराट कोहली व के एल राहुल सावध खेळ करत आहेत.
अशातच 8 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जॉश हेजलवूड विराट कोहलीचा संयम तोडण्यात यशस्वी झाला. जॉशने टाकलेल्या आखूड टप्प्याचा चेंडू सीमारेषेपार टोलवण्याचा प्रयत्न कोहलीने केला खरा, पण व्यवस्थित टायमिंग करता न आल्याने चेंडू हवेत वर गेला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून हा अगदी सोपा झेल मिशेल मार्शकडून सुटला.
झालं असं की, हा झेल पकडण्यासाठी शॉर्ट स्वीकार लेगच्या दिशेने ऍलेक्स कॅरी आणि मिशेल मार्श धावले. झेल कोणी पकडायचा याबाबत दोघांमध्ये काहीसा संभ्रम होता. अखेर मिशेल मार्श झेल पकडण्यासाठी पुढे सरसावला मात्र चेंडू त्याच्या हातातून सुटून मांडीवर पडला.
कोहलीच्या बॅटला लागून चेंडू उंच हवेत गेल्यानंतर प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला होता. मार्शने झेल सोडताच मैदानात जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी एकत्र हुश्य करत सुटकेचा निश्वास सोडला!