Maharashtra Rain : राज्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळीचा फटका शेतीपिकांना बसला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी भारतीय हवामानविभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तासम्हणजेच पुढचे २ दिवस राज्यात पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली आहे. विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून राज्याच्या दक्षिण भागात सक्रिय झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्याने परिणामी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
पुढील 48 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे .
अरबी समुद्रालगत चक्रावार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदियामध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.