पुणे – उकाड्यासह उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे. शनिवारी (दि. २७) शहरातील कमाल तापमान ४२ अंशाच्या पुढे नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. शहरात कोरेगांव पार्क येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मागील आठवडाभरात उन्हाचा पारा खाली-वर होत आहे. त्यामुळे चटका कमी झाला असला तरी उकाडा कायम आहे. दिवसभर ऊन आणि रात्री गारवा अशी परिस्थिती होती. मात्र, गेल्या ४८ तासांत शहरातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ४० अंशापर्यंत खाली आलेला पारा आज ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दुपारचा चटका आणि उकाड्यामध्ये वाढ झाली आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
कोरेगांव पार्क – 42.8, चिंचवड – 42.5, शिरूर – 41.8, वडगावशेरी – 41.7, राजगुरूनगर – 41.4, मगरपट्टा – 41.2, हडपसर – 41.1, पाषाण – 40.2, एनडीए – 40.1, शिवाजीनगर 39.9, बारामती – 39.8, नारायणगाव – 38.5, हवेली – 38.4, भोर – 38