मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार यांनी रविवारी दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावरही दावादेखील सांगितला. त्यासोबतच आम्ही वरिष्ठांशी बोलूनच हा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, आज मुंबईत दोन्ही गटाने बैठक बोलावली आहे. आज राष्ट्रवादी कुणाची असणार हे ठरणार आहे. अशात सोशल मीडियावर रोहित पवार अजित पवारांची जागा घेणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांचे दुसरे पुतणे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना त्यांनी आपल्या शेजारी बसविले होते. त्यामुळे आता अजित पवार यांची जागा रोहित पवार घेणार का? यावरही चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात झालेल्या राजकीय बंडाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यानुसर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत संख्याबळ आपल्याकडे जास्त असून पक्ष आणि चिन्ह याच्यावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांच्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाने देखील निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. त्यानुसार या गटाकडून देखील एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात पक्षच्या संघटनेवर आपला दावा सांगितला आहे. तसेच निर्णय घ्या अगोदर आमचंही म्हणणं ऐकून घ्या अशी विनंती या आयाचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं कोणाच्या बाजूने निर्णय देते हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान,आज राज्यात एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आले आहेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत.