लोणावळा – मराठी पाट्या लावण्याच्या मुद्द्यावरून लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली; तरीदेखील लोणावळा शहराच्या सुस्त नगरपरिषद प्रशासनाने आजपर्यंत येथील इंग्रजी पाट्यांवर कारवाई केलेली नसल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी येथील दुकानांच्या पाट्या फोडायला सुरुवात केली.
लोणावळा शहर मनसेने 24 नोव्हेंबरपासून नगरपरिषदकडे शहरातील इंग्रजी पाट्यां संदर्भात पाठपुरावा केला होता. मात्र नगरपरिषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत मनसे पदाधिकार्यांनी सोमवारी लोणावळा शहरातील दुकानांवर असलेल्या इतर भाषिक पाट्या फोडायला सुरुवात केली. मनसेने अचानक सुरू केलेल्या या तोंडफोडीने जाग्या झालेल्या नगरपरिषद प्रशासनाने यासंदर्भात मध्यस्थी करीत दुकानदारांना मराठी पाट्या दुकानावर लावण्यासंदर्भात नोटीस दिल्या. त्यावर मनसे शहराध्यक्ष भारत रमेश चिकणे यांनी आठ दिवसांची मुदत देत आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात अमित भोसले, निखिल भोसले, दिनेश कालेकर, सुनील भोंडवे, निखिल सोमण, उमेश बोडके, अभिजित फाजगे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, दीपमाला बोभाटे, विश्रांत साठे, कैवल्य जोशी, विशाल सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.