पुणे – फर्गसन रस्त्यावर सर्वात मोठे अतिक्रमण असलेल्या शिरोळे प्लाॅटवरील तब्बल ७० दुकानांंवर तब्बल ८ वर्षांनंतर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर संबंधितांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कारवाईवर स्थगिती मिळविली होती. त्यानंतर,गेली आठ वर्षे सातत्याने पाठपुरावा करून महापालिकेने ही स्थगिती उठविण्यात यश मिळविले, त्यानंतर लगेचच न्यायालयात कॅव्हेट दाखल करत सोमवारी ही दुकाने जमीनदोस्त केली. या रस्त्यावरील हे अतिक्रमण सर्वात मोठे होते.
शिरोळे प्लॉट येथे महापालिकेची परवानगी न घेता विनापरवाना शॉपिंग मॉल उभारण्यात आलेला होता. या ठिकाणी लोखंडी एंगल, गर्डर ,पत्रे इ. चे सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. या मध्ये छोटी मोठी मिळून 70 स्टॉल वजा दुकाने चालू होती. तसेच सुमारे ७ हजार चौरस मीटर जागेत हे अतिक्रमण होते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आणि मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असल्याने आगीसारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. ही बाब गांभीर्याने घेत महापालिकेने न्यायालयात पाठपुरावा करून ही कारवाई केली आहे.
एक जेसीबी, गॅस, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. मॉल मध्ये कपड्यांची दुकाने असल्याने आग लागण्याची शक्यता होती. यामुळे अग्नीशमनची एक गाडी तयार ठेवण्यात आली होती. शिवाजी नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनिस यांच्यासह अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केली.
पुन्हा अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी
महापालिकेने या रस्त्यावर यापूर्वीही ही जागा वगळता हाॅटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. मात्र, त्यानंतर लगेच पुढच्याच दिवशी अतिक्रमणे पुन्हा झालेली आहे. अशा जवळपास २२ वारंवार होत असलेल्या अतिक्रमणांची यादीच हतबल झालेल्या महापालिकेने पोलिसांंना दिली आहे. त्यामुळे सोमवारी कारवाई केलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी महापालिका कशी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.