Parbhani Lok Sabha Election 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मला आपलंसं केलंय. मी जवळपास 90% मतदार संघ फिरलो. येथील नागरिक माझ्या पाठीशी आहेत. या लोकसभा निवडणुकीत माझी लीड साडेचार लाखाची राहील आणि जर परभणीतून निवडून आलो नाही तर मी संन्यास घेईल, अशी घोषणाच परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी केली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी महादेव जानकर यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन मतदारांना केले होते. उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला महादेव जानकर यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
महादेव जानकर म्हणाले, सध्या शेतकऱ्यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री झालाय. तर माझ्यासारखा बहुजनांचा मुलगा खासदार झालेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखावत नाही का? ते माझ्यावर टीका करत आहेत. 26 एप्रिल नंतर राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे, त्या लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी विरोधात आपण रान पेटवणार असल्याचा इशारा देखील जानकर यांनी दिला.
दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांच्यात लढत होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत.