Billiards Hall of Fame :- भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचा समावेश चीनमधील शांगराव शहरातील वर्ल्ड बिलियर्ड्स संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. पंकज अडवाणीने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे. त्याने गेल्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये विक्रमी 26व्यांदा आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकले होते.
त्याने नोव्हेंबरमध्ये बिलियर्सच्या या लाँग फॉरमॅटच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्याच सौरव कोठारीला पराभूत केले होते. यासह 9व्यांदा बिलियर्सच्या या लाँग फॉरमॅटचे पंकजने विजेतेपद जिंकले होते. पंकज अडवाणीने हॉल ऑफ फेममध्ये सामील केल्यानंतर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने म्हटले ‘वर्ल्ड बिलियर्ड संग्रहालयात हॉल ऑफ फेममध्ये माझा समावेश केल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. या अभूतपूर्व प्रवासात मला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला, ज्यासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे.’
त्याने पुढे म्हटले, ‘आपल्या देशाचे आणि संपूर्ण बिलियर्स कम्युनिटीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मला आनंद आहे. मी यापुढेही या खेळाप्रती माझे समर्पण आणि मेहनत कायम ठेवेल. सर्वांना अभिमान वाटावा यासाठी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्नही कायम असेल.’ पंकज अडवाणीने अनेकदा भारताचे नाव बिलियर्ड्समध्ये उंचावले आहे.