नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरूच आहेत. आज त्यांनी सकाळी ‘जेल का जवाब वोट से’ अशा घोषणा देत मोर्चा काढला.
लक्ष्मी नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर आंदोलन करताना, आप पूर्व दिल्लीचे लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार म्हणाले की दिल्लीतील जनता संतप्त आहे आणि ते भारतीय जनता पक्षाला २५ मे रोजी मतदानाच्यावेळी धडा शिकवतील.
भाजपने एका लोकप्रिय मुख्यमंत्र्याला खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याचा कट रचला आहे असे कुलदीप कुमार यांनी एएनआयला सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पूर्व दिल्ली परिसरात रोड शो केला.
त्यांचा असाच दुसरा रोड शो २८ एप्रिल रोजी पश्चिम दिल्ली परिसरात होणार आहे.केजरीवालांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणुकीसंबंधातील जिद्द आणखी वाढलीअसून जनतेनेही केजरीवालांना समर्थन दिले आहे असे आपच्या नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे.