पुणे – करोनामुळे वाया गेलेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर आंतरराष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे पुनरुज्जीवन झाले आणि जेमतेम एका आठवड्याच्या कालावधीत दोहा, कतार येथे पार पडलेल्या जागतिक आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम स्नूकर खेळाडू पंकज आडवानीने विजतेपद पटकावत आपल्या खात्यात 24 वे जागतिक सुवर्णपदक आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा असे दोन बहुमान पटकावले.
हौशी स्नूकर गटात त्याने पुन्हा लक्षवेधी कामगिरी करत आपण अपराजित व अजिंक्यवीर असल्याचे दाखवून दिले. जागतिक स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा बाबर मसिह याच्या विरुद्ध पंकज आडवानीने 7-5 असा अफलातून विजय मिळवला. सामन्यात 2-6 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या बाबरने 5-6 असे पुनरागमन केले होते. परंतु पंकजने आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद पटकावले.
तसेच, आशियाई सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत पंकजने इराणच्या आमीर सरखोशचा 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचे आशियाई स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक असून याआधी 2019 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
बिलियर्डस (वेळ व गुण फॉरमॅट) च्या सर्व प्रकारात विजेतेपद पटकवणारा पंकज आडवानी हा जगातील एकमेव खेळाडू आहे. तसेच, याआधी मायकेल फेरेरा आणि गीत सेठी यांनी जागतिक बिलियर्डस स्पर्धेत अनेकवेळा विजेतेपद पटकावले आहे.