रेडा – इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी येथे सात जण व अनोळखी चार जणांनी जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबार करून एकास गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री 12:30 वाजता घडली. यामध्ये लक्ष्मण सुभाष धनवे (रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रोहित मनोज इंगळे (वय 20, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यामध्ये आरोपी अतुल शेटे पाटील, सोमनाथ खरवडे, बंटी पाचनकर, भैय्या चित्राव, सुमित साळुंखे, विठ्ठल महाडिक, शंभू पवार व तसेच इतर चार जण (सर्व रा. मेन पेठ, इंदापूर) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटीत खिलारे यांच्या दुकानासमोर रोहित इंगळे व त्याचा मित्र लक्ष्मण सुभाष धनवे, संतोष भगवान साळुंखे हे गप्पा मारत बसले असताना यातील आरोपींनी त्यांची डस्टर कार तसेच तीन मोटरसायकलींवरून येत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी नंबर एक अतुल शेटे पाटील म्हणाला की, तुम्हांला लय माज आला आहे काय.., असे म्हणुन त्याच्या हातातील पिस्तूलाने फिर्यादी यांचे दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र घाबरून इकडे तिकडे पळत असताना लक्ष्मण धनवे यांच्या उजवे पायाच्या पिंडरीवर गोळी लागून तो जखमी होऊन जमिनीवर पडला, त्यावेळी उर्वरीत सहा आरोपी व अनोळखी चार जणांनी लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेवून फिर्यादी व त्यांचे मित्रांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला, त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र अंधाराचा व गल्लीबोळाचा फायदा घेऊन तेथून पळून गेले व पुढील गल्लीच्या एका बोळात जावून लपले.
त्यावेळी आरोपींची फिर्यादीच्या मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले व शिवीगाळ दमदाटी करून निघून गेले, अशी फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे करीत आहेत. बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले.
मोटारसायकली, रुग्णवाहिकेचे नुकसान…
आरोपींकडून सोसायटीमधील पल्सर (एमएच 42 एबी 1866) गाडीची टाकी, बॅटरी फोडून नुकसान केले तसेच स्प्लॅडर (एमएच 14 बीएस 8263) गाडीच्या टाकीचेही नुकसान केले असून पै. स्व. पांडुरंग रामचंद्र खिलारे (गुरुजी) प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा (एमएच 42 एक्यू 9009) पत्रा गोळी लागल्याने फाटला आहे.