सणसवाडीत महिलेचा गळा आवळून खून

शिक्रापूर  – सणसवाडी (ता. शिरूर) येथील सराटेवस्ती येथे महिलेचा खून झाल्याची घटना घडली. महिलेच्या घराच्या बाजूला दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी घरात पाहणी केली असताना या महिलेचा खून झाल्याचा उलगडा झाला. आरती अजित शिंदे (वय 25) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश हरगुडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या तीन दिवसांत तळेगावपाठोपाठ सणसवाडीतील खुनाची दुसरी घटना घडली आहे.

सराटे वस्ती येथील महिलेच्या खोलीत दुर्गंधी पसरली. शेजाऱ्यांनी खोलीत पाहिले असता त्यांना महिला मृतावस्थेत पडलेली दिसली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी या खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. या महिलेचा टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. यावेळी चौकशी केली असता खोलीमध्ये मयत महिलेबरोबर पती म्हणून राहत असलेला व्यक्‍ती तीन दिवसांपासून दिसला नव्हता. पती अजित याने आरतीचा खून करून फरार झाल्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.