…मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिष व्यवसाय सुरू करावा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला : “वंचित’ला भाजपचेच पाठबळ

पुणे – “विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधीपक्ष नेता होईल,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्‍तव्यांची खिल्ली उडवत “मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिष व्यवसाय सुरू करावा,’ असा टोला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मारला. “वंचित बहुजन आघाडीला वाढवण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे,’ हेच यातून स्पष्ट होत असल्याचेही चव्हाण म्हणाले.

येथे पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. “देशभरात जे विरोधक भाजपामध्ये येणार नाहीत त्यांच्याविरुद्ध चौकशी लावली जात आहे. चौकशी लावू, अशी धमकही दिली जाते. फक्‍त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही, तर कॉंग्रेस नेत्यांनाही अशाच धमक्‍या देऊन भाजपमध्ये घेतले जात आहे.’ देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे स्पष्ट करताना चव्हाण म्हणाले, “रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे घेण्याचा प्रकार यापूर्वी इतिहासात कधी झालेला नाही.

हे चुकीचे धोरण आहे. सध्या देशात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. आजच विकासदर जाहीर झाला आहे. हा दर नीचांकी आहे. रोजगार निर्मितीवर कोणताही भर देण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे घेतले जातात, याचा अर्थ वित्तीय घट वाढली आहे, पण केंद्र सरकार हे जाहीर करायला तयार नाही. जीएसटीच्या अंमलबजावणी झालेला घोळ आणि आर्थिक मंदी ही त्याची कारणे आहेत. पण, केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही.’

बॅंकांचे विलीनीकरण कशासाठी?
आघाडी सरकारच्या काळातदेखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी कारवाई केली, पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यावर हे सरकार संबंधितावर कारवाई करत नाही. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बॅंकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार, याचे योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही, असे चव्हाण म्हणाले.

राष्ट्रीयीकृत बॅंकांत आर्थिक घोटाळे
गेल्या पाच वर्षांत बॅंक घोटाळ्यांत वाढ झाली आहे. आतापर्यंत तब्बल 71 हजार 543 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, हा घोटाळा ज्या बॅंकांमध्ये झाला आहे, त्यातील 90 टक्के बॅंका या राष्ट्रीयीकृत आहेत, याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. अशा प्रकारांबाबत आगामी काळात धाडसी पावले उचलली पाहिजेत. याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी चव्हाण यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.