लॉकडाऊनमुळे मिळाली होती मुदतवाढ : पालिकेला उत्पन्नवाढीची आशा
पुणे – पुणेकरांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. 31 मेपर्यंत असलेली ही मुदत महापालिका प्रशासनाने लॉकडाऊनमुळे 1 महिन्यासाठी वाढवली होती. त्यानंतर नागरिकांना मिळकतकरावर प्रतिमहिना 2 टक्के दंड मोजावा लागणार आहे.
नागरिकांनी मिळकतकर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जमा करावा, या उद्देशाने महापालिका एप्रिल आणि मेमध्ये कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत देते. त्यात, सर्वसाधारण कर 25 हजारांपेक्षा कमी असल्यास 10 टक्के वर 25 हजारांपेक्षा जास्त असल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व शासकीय कार्यालये बंद होती. त्यातच, बिलांचे वाटपही करता आलेले नव्हते. त्यामुळे पालिकेने नागरिकांना ऑनलाइन कर भरण्यासाठी मेसेज तसेच लिंक पाठविण्यात आली होती. मात्र, त्याला दरवर्षीप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता.
मात्र, 10 मेपासून शहरात पालिकेने करसंकलनासाठी नागरी सुविधा केंद्र सुरू केल्याने मागील दहा ते पंधरा दिवसात कर भरण्यास सुरूवात करण्यात आली होती. तर 31 मे रोजी सवलीत कर भरण्यासाठी 30 आणि 31 मे रोजी नागरिकांच्या करभरणा केंद्रावर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडूनही ही मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर महापालिका आयुक्तांनी 31 मे रोजीच त्यास मुदतवाढ दिली होती.
मुदतवाढीत 105 कोटींचा कर जमा
कर भरण्यास मुदतवाढ दिल्यानंतर मागील 20 दिवसांत तब्बल 105 कोटींचा कर जमा झाला आहे. 31 मे अखेर पालिकेस सुमारे 387 कोटींचा कर मिळाला होता. तर 21 जून अखेर ही रक्कम तब्बल 492 कोटींवर गेली आहे. तर शेवटचा आठवडा असल्याने आणखी 70 ते 80 कोटींचा कर जमा होण्याची शक्यता जात आहे. लॉकडाऊन शिथील झाल्याने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने करभरणा वाढण्याची महापालिकेस अपेक्षा आहे.