पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाला अवघ्या १२ दिवसांत ११४ कोटींचा महसूल मिळाला. नागरिकांंना अद्याप मिळकतकराची बिले मिळालेली नसली तरी महापालिकेकडून नागरिकांना बिलांची माहिती एसएमएस तसेच इ-मेल द्वारे पाठविली असून छापील बिलांची वाट न पाहताच पुणेकर कर भरण्यास प्राधान्य देत आहेत.
तर जमा झालेल्या मिळकतकरात तब्बल ८० टक्के कर आॅनलाइन जमा करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून पुढील काही दिवस जास्तीत जास्त पुणेकरांनी मिळकतकर आॅनलाइन भरावा यासाठी वेगवेगळ्या मोहीमा राबविल्या जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी महापालिकेने १५ मे नंतर पुणेकरांना बिले दिली होती. त्यानंतरही बिलांबात संभ्रम असल्याने नागारिकांकडून वेळेत बिले भरली जात नसल्याने महापालिकेस १०० कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा गाठण्यासाठी जून महिना उजाडला होता.
मात्र, या वर्षी महापालिकेकडून मार्च अखेर पासूनच नागरिकांना पोस्टाद्वारे बिले पाठविण्यास सुरूवात केल्याने तसेच एसएमएस द्वारे बिले पाठविल्याने नागरिकांकडून मिळकतकर वेळेत भरण्यास प्राधान्य दिले जात आहे.