कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यात तुफान वारा ढगांचा गडागट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले. या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या 100हून अधिक झोपड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यामुळे एक हजारपेक्षा अधिक ऊसतोड कामगार उघड्यावर आले आहेत.
करोना विषाणूमुळे सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनचा सर्वधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटांचा सामना ऊसतोड मजूरांना करावा लागत आहे. शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या 100हून अधिक झोपड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या परिसरात 5000 लहान मोठी जनावरे आणि चार हजार ऊसतोड कामगार आहेत.
गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळत आहे. याचा फटका यापूर्वीदेखील ऊसतोड कामगारांना बसला आहे. मात्र रात्री झालेल्या या पावसाने तर कहरच केला आणि या ऊसतोड कामगारांचा संसार अक्षरशः जमीनदोस्त केला.
टोल नाक्याचे छत कोसळून 6 जखमी
कोल्हापूरसह ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा ते शिरोली एमआयडीसी रस्त्यावरील शिये टोल नाक्याचे संपूर्ण छत कोसळले. त्यात एका पोलीस कर्मचा-यासह 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. रात्री पावणे नऊच्या सुमारास जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे बावड्यातील या टोल नाक्याचे पूर्णपणे मोडकळीस आलेले शेड जमीनदोस्त झाले. या टोल नाक्यावर करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त होता. यामुळे यात एका पोलिसासह सहा जण किरकोळ जखमी झाले असून काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.