कामबंद आंदोलनाचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचा इशारा; पोलिसांचा हस्तक्षेप
पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित रुग्णांना तात्काळ उपचार देऊन त्यांना बरे करण्यासाठी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दिवस-रात्र मेहनत करत आहे. अशा परिस्थितीत अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केल्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली. एवढच नव्हे तर काही कर्मचाऱ्यानी “बदली रद्द व्हावी, आम्ही काम बंद आंदोलन करू’ अशी घोषणाबाजी करत इशाराही दिला.
डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईत वैद्यकीय शिक्षण सहसंचालक या ठिकाणी बदली झाली. शुक्रवारी (दि.17) हा पदभार स्वीकारण्याआधीही डॉ. चंदनवाले यांनी ससून रुग्णालयात जाऊन, मागील 12 तासांतील कामाचा आढावा घेतला. रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना डॉक्टरांना केल्या. एवढेच नव्हे, तर नियमित ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करून ते मुंबईला रवाना झाले.
दरम्यान, ऑफिसमधून बाहेर पडत असताना, डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांनी डॉ. चंदनावाले यांची भेट घेतली. आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या बदलीचा निषेध व्यक्त केला. तर काही कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारने ही बदली रद्द करावी अशी मागणी केली. यावेळी अधिष्ठाता कार्यालय परिसरात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सर्वांना कार्यालयात जाण्यास सांगितले. दरम्यान, यावेळी डॉ. चंदनवाले यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार देत मुंबईला रवाना झाले असून आजच ते सहसंचालकाचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले.