कष्टकरी जनता आघाडीचा भाजप, शिवसेना युतीला पाठिंबा

भोसरीतून आमदार महेश लांडगे यांना विजयी करण्याचे आवाहन

पिंपरी – कष्टकरी जनतेचे सरकार दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. उर्वरित प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कष्टकरी जनता आघाडीने भाजप, शिवसेना युतीला पाठिंबा जाहीर केला आहे, असे कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी येथे सांगितले. भोसरी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या समवेत कष्टकरी जनता आघाडीची बैठक झाली. यावेळी कांबळे बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, कष्टकरी जनता आघाडीचे प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, शोभा शिंदे, आशा कांबळे, दत्तात्रय शिंदे, लालचंद पवार, नितीन ठक्कर, मल्हार काळे, कौसल्या नेटके, अनिता काजळे आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, देशात 40 कोटी तर महाराष्ट्रात 3 कोटी असंघटित कामगार आहेत. त्यात रिक्षा चालक, टेम्पो ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, फेरीवाले, पथारीवाले, बांधकाम मजूर, घरकाम करणा-या महिला, कागद, काच, कचरा वेचक आदी कष्टक-यांचा समावेश आहे. या कष्टकरी जनतेचे अनेक प्रश्‍न सरकार दरबारी प्रलंबित होते. त्यातले अनेक प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले आहेत.

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापनेबरोबरच बांधकाम मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना सरकारने राबविल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर कष्टकरी जनता आघाडीचा विश्‍वास आहे. ते कष्टक-यांचे प्रश्‍न सोडवतील, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना युतीला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी कांबळे यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.