जामखेड : महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत परंपरेचं नवं उदाहरण आज चौंडी ता जामखेड इथं पाहायला मिळालं. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असुन शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी कर्जत जामखेड ची जागा जिंकल्या नंतर रोहित पवार यांनी थेट चौंडी येथे जाऊन अहिल्यादेवींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले नंतर रोहित पवार यांनी कुटुंबियांसोबत थेट पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी भेट दिली यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला तसंच, नव्या वाटचालीसाठी राम शिंदेच्या आईचे आशीर्वादही घेतले.
जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असं कधीही पाहायला मिळालं नाही. पण ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच घरी जाऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका परंपरेचा पायंडा कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात पडला आहे. महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपचे नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव धक्कादायक पराभव केला.
मात्र, प्रचारातील हेवेदावे बाजूला सारून नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज मतमोजणी झाल्यानंतर राम शिंदे यांच्या चौंडी गावी जाऊन प्रथम अहिल्यादेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर रोहित पवार यांनी आई सुनंदाताई पवार ,पत्नी कुंतीताई पवार यांच्यासमवेत राम शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राम शिंदेही तितक्याच खुल्या दिलानं पवार यांचं स्वागत केलं. रोहित पवार यांना फेटा बांधून विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.
यावेळी शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे याही सोबत होत्या आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या सोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. “मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहू दे, असं रोहित पवार राम शिंदे यांच्या आईला म्हणाले गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सर्वांनी अनुभवला. या दरम्यान नेत्यांमध्ये झालेले अनेक वाद-विवाद, टीका-प्रतिटीका आणि टोकाची ईर्षाही पाहायला मिळाली. पण रोहित पवार यांनी आज चक्क राम शिंदेच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या कृत्याने कर्जत जामखेडमध्ये राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाल्याचं दिसत आहे.या भेटीची जोरदार चर्चा कर्जत-जामखेडमध्ये रंगली
राम शिंदे यांचा पराभव
अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार राम शिंदेंना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी राम शिंदेचा सुमारे ४३ हजार मतांनी पराभव केला. मतदारसंघातून रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली तर राम शिंदे यांना ९२ हजार ४७७ मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव यांना ३ हजार ८४९ इतकी मतं मिळाली.