पुणे – मागील दोन दिवसांपासून उष्णतेचा कमी झालेला पारा शनिवारी पुन्हा 43 अंश सेल्सिअसवर गेला. तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील कमाल तापमान 42 अंशाच्या पुढे होते. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुर्यनारायण अधिक तापल्यामुळे कमाल तापमान 43.5 अंशापर्यंत म्हणजेच हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली असून उकाडाही अधिक वाढला आहे. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान वाढलेले होते.
मात्र, मागील दोन दिवसात एक ते दोन अंशाने कमाल तापमानात घट झाल्यामुळे उन्हाचा काहीशा कमी झाला होता. तसेच कमाल तापमानातही घट झाल्यामुळे पहाटे गारवा जाणवत होता. शनिवारी (दि. 4) दिवसभरात उन्हाचा पारा पुन्हा एक ते दोन अंशाने वाढला असून, 41 अंशापर्यंत खाली आलेले कमाल तापमान 43 अंशावर जावून पोहचले आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
ढमढेरे – 43, शिरूर – 42.3, पुरंदर 42, इंदापूर – 41.5, मगरपट्टा, वडगावशेरी, चिंचवड आणि कोरेगांव पार्क – 41.1, राजगुरूनगर – 40.9, बारामती – 40.1, दौंड – 39.9, हडपसर – 39.7, शिवाजीनगर आणि एनडीए – 39.6, पाषाण – 39.4, तळेगाव – 39.2, हवेली – 38.2.