नगर – लोकसभा निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीत खर्च सादर न केल्याल्या चार उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना ४८ तासात खर्च सादर करावा, अन्यथा निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाइल असे ही म्हटले आहे.
लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी त्यांची दैनंदिन खर्चाची नोंदवही संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांसमोर सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवार (दि.३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांच्या उपस्थितीत पार पडली. या तपासणीस २५ उमेदवारांपैकी २१ उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच उमाशंकर श्यामबाबू यादव, अमोल विलास पाचुंदकर, रावसाहेब शंकर काळे व दिलीप कोंडीबा खेडकर हे ४ उमेदवार अनुपस्थित असल्यामुळे त्यांना आयोग यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांच्याद्वारे नोटीस देण्यात आली आहे.
निरीक्षक शक्ती सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही निवडणूक आयोग यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. दुसरी तपासणी दि.७ मे रोजी पार पडणार आहे. या तपासणीसाठी सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवही व इतर अनुषंगिक कागदपत्रे यासह उपस्थित राहावे, असे आवाहन खर्च निरीक्षक शक्ती सिंग यांनी केले आहे. यावेळी प्रथम तपासणी साठी नोडल अधिकारी ( खर्च) शैलेश मोरे, सहाय्यक खर्च निरीक्षक अजय कुमार, सहाय्यक समन्वय अधिकारी (खर्च) विशाल पवार,भाग्यश्री जाधव,राजू लाकूडझोडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.