पुणे – व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन (बीसीए) पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज करण्यास रविवारी (दि.५) अंतिम मुदत आहे.
राज्य सीईटी सेलकडून बीसीए, बीबीए, बीएमएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या सीईटीची नोंदणी सुरू करण्यात आली.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या परीक्षेबाबत अद्याप फारशी जागृती नसल्याने नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एमबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीची ५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम, मबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी २७ ते २९ मे या कालावधीत होणार आहे.