बागवान यांच्या तक्रारीत तथ्य नाही : यशवंत डांगे
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील ट्रॉली खरेदीबाबत इम्तियाज बागवान यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही. निविदेनुसार हैदर स्टीलने नगरपालिकेला ट्रॉली दिली. 29 ऑक्टोबर 2011 रोजी शहरात काढलेल्या नवीन घंटागाड्यांच्या रॅलीत ही ट्रॉली सहभागी होती. ती कराडकरांनी पाहिली आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबरला याचे बिल अदा केलेले आहे. आरटीओ कायद्यानुसार ट्रॉलीला ब्रेक सिस्टीम आवश्यक असल्याने पासिंग रखडले होते. ते मी या कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्यानंतर 25 एप्रिलला झाले. यात एस. बी. स्टीलने दिलेले 1 लाख 40 हजाराचे बिल ही चेसीची किंमत आहे. याशिवाय फॅब्रिकेशनचा खर्च वेगळा आहे. ट्रॉली नगरपालिकेला मिळाल्यानंतरच बिल काढले आहे. याबाबत बागवान यांनी केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. सदर ट्रॉली खरेदीचा खर्च नगरपालिका फंडातून केलेला असून घनकचरा डीपीआरशी संबंधित नाही.
कराड – कराड नगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापनसाठी लागणाऱ्या ट्रॉली खरेदी व्यवहारात मोठा अपहार करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाबरोबरच लोकपतिनिधींनी संगनमताने 2 लाख 89 हजार 189 रुपयांचा खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून गंडा घातला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर अपहाराशी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी लेखी तक्रार शासनाकडे केल्याची माहिती सामाजिक कायकर्ते इम्तियाज बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, कराड नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आरोग्य विभागासाठी खरेदी केलेल्या नवीन ट्रॅक्टरकरिता ट्रॉली खरेदी करण्यासाठी 2 लाख 89 हजार 129 रूपयांची निविदा दि. 9 ऑक्टोबर 2018 रोजी मंजूर केली. मंजूर निविदेनुसार ट्रॉली पालिकेकडे जमा झाल्याची नोंद सहाय्यक खरेदी पर्यवेक्षक धन्वंतरी साळूंखे यांनी केली आहे. ट्रॉलीच्या बिलाची मागणी हैदर वर्क्सने केली असता अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या सहीने 2 लाख 30 हजार रुपयांचा धनादेश काढण्यात आला. या ट्रॉली खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. ट्रॉली मिळाल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून हा निधी लाटला गेल्याचा आरोप त्यांनी केला.
संबंधित ट्रॉलीचे आरटीओ पासिंग दि. 25 एप्रिल 2019 रोजी करण्यात आल्याचे आरसी बुकवरून समोर आले. मात्र यात काही गोलमाल झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडे माहितीचा अर्ज दाखल केला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून प्रत्यक्षात मे. हैदर स्टील वर्क्स कराड यांनी पालिकेला ट्रॉली पुरवली नसतानाही बोगस कागदपत्रांच्या जोरावर अपहार करण्यात आला असे बागवान यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बागवान यांनी दिली.