मिळकतकर सवलतीचा फेरविचार!

हॉस्पिटल, आयटी कंपन्यांना पालिकेने दिली आहे सवलत  

…म्हणून निर्णयाचा फेरविचार

शहरात रोजगार निर्मितीसाठी आयटी कंपन्यांची मदत होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार, त्यांना काही कालावधीसाठी या सवलती देण्यात आल्या होत्या. आता या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. याशिवाय, शहरातील काही रुग्णालयांना रुग्णांना सवलतीत उपचार द्यावे म्हणून त्यांच्या वातानुकूलित विभागांना घरगुती दराने कर आकारणी केली जाते. मात्र, त्यांच्याकडून रुग्णांना सवलत देण्याऐवजी या सुविधेची अधिक रक्कम आकारली जाते. त्यामुळे या सुविधांचा फेरविचार करण्यात येत आहे.

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी करात सवलत देण्यात आलेल्या रुग्णालये, आयटी कंपन्या तसेच इतर काही विशेष सवलतींचा फेरविचार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांना सेवा देणाऱ्या तसेच शहरात रोजगारनिर्मिती करण्यासाठी या संस्था हातभार लावणार असल्याने महापालिकेकडून त्यांना व्यावसायिकऐवजी निवासीदराने कर आकारणी केली जाते. मात्र, त्यांना काही कालावधीसाठी निश्‍चित केलेली ही सवलत अद्यापही कायम आहे. त्यामुळे या संस्था व्यावसायिक दराने उत्पन्न मिळवित असल्या, तरी पालिकेस मात्र आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

महापालिकेकडून शहरातील काही प्रमुख रुग्णालये तसेच आयटी कंपन्यांना मिळकतकरात सवलती देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून व्यावसायिक दराने कर आकारणी न करता त्यांच्या काही भागावर घरगुती दराने करआकारणी केली जाते. महापालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही सवलत देण्यात येते.

ही सवलत रद्द करण्याबाबत तसेच त्याचा फेरविचार करण्याबाबत तत्कालिन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी वेळोवेळी कार्यालयीन परिपत्रके काढून प्रशासनास सूचना दिल्या होत्या. मात्र, राजकीय दबावामुळे ही कारवाई होऊ शकलेली नाही. महापालिकेकडून नुकतीच महसुली समिती नेमली असून या समितीच्या बैठकीत सवलतीमुळे बुडणाऱ्या या उत्पन्नावर चर्चा झाली. त्यात झालेल्या चर्चेनुसार, या कर सवलतीचा फेर विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना कर संकलन विभागास देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.